डांबरीकरण केलेला रस्ता पुन्हा खोदला   

खोदकामाची जबाबदारी घेण्यास टाळाटाळ

पुणे : महापालिकेच्या पथ विभागात डांबर घोटाळा उघडकीस आला आहे. या घोटाळ्याची चौकशी सुरु आहे. डांबर घोटाळ्या प्रकरणी पालिकेचा पथ विभाग चांगलाच चर्चेत आला आहे. त्यानंतर शहरात विविध रस्त्यांची खोदाई करुन विविध कामे केली जात आहेत. परंतु कोणता रस्ता कोणत्या कारणासाठी खोदला जात आहे. याची माहिती पथ विभागालाच नसल्याचे समोर आले आहे. अनेक ठिकाणच्या खोदाईबाबत पालिकेच्या पथ विभाग आणि क्षेत्रीय कार्यालय एकमेकांवर टोलवाटोलवी करत असून वरिष्ठ अधिकारी अंधारात आहेत. या निमित्ताने महापालिकेच्या पथ विभागाचा नियोजनशून्य कारभार समोर आला असून खोदाईच्या कामात देखिल घोटाळा केला जात नाही, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जाऊ लागला आहे.
 
पावसाळ्या पूर्वी शहरातील रस्त्यांचे डांबरीकरण करण्याचे काम पथ विभागाकडून वेगाने केले जात आहे. डांबरीकरण केलेल्या रस्त्यावर पुन्हा खोदाईला परवानगी दिली जाणार नाही. असे पथ विभागाने जाहिर केले होते. परंतु रस्ता तयार होताच पुन्हा खोदला जात आहे. धायरी ते डीएसके विश्वला जोडणार्‍या रस्त्यावर पालिकेच्या पथ विभागाने चार दिवसांपूर्वीच डांबरीकरण केले होते. मात्र, सोमवारी खासगी ठेकेदाराने एका इमारतीला सांडपाणी वाहिनी जोडण्यासाठी बेकायदा हा रस्ता जेसीबीने खोदलाच, शिवाय जुनी सांडपाणी वाहिनी फोडून टाकली. नागरिकांनी जाब विचारल्यानंतर हे काम बंद पाडण्यात आले. दरम्यान पालिकेच्या पथ विभागाकडून संबंधित ठेकेदार, बिल्डर आणि हे काम करायला लावणार्‍या व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे सांगितले.
 
महापालिकेच्या पथ विभागाकडून विविध सेवा वाहिन्या टाकण्यासाठी शासकीय, निमशासकीय व खासगी कंपन्यांना शुल्क आकारून खोदकामाची परवानगी दिली जाते. खादाईसाठी १ ऑक्टोबर ३१ एप्रिलपर्यंत खोदाईला परवानगी दिली जाते. त्यानंतर पुढील एक महिन्यात रस्ते दुरुस्त केले जातात. पावसाळ्यापूर्वी पथ विभागाकडून शहरातील रस्ते दुरुस्ती केले जात आहेत. अनेक रस्ते डांबरीकरण करून चकाचक केले जात आहेत. ज्या रस्त्यांवरील खोदाईची कामे झालेली आहेत, असे रस्त्यांवर डांबरीकरण केले जात आहे. ज्या रस्त्यावर डांबरीकरण झाले आहे, असा रस्त्यावर खोदाईसाठी कोणालाही परवानगी दिली जाणार नाही, असे पथ विभागाकडून सांगितले जाते. मात्र अधिकार्‍यांना अंधार ठेवून अनेक ठिकाणी डांबरीकरण केल्यानंतर काही दिवसातच रस्ते पुन्हा खोदले जात आहेत. 

रस्त्यांची अवस्था वाईट 

धायरी परिसरातील रस्त्यांच्या अवस्था अतिशय वाईट आहे. खराब रस्त्यांमुळे वाहनचालकांसह नागरिक त्रासले आहेत. रस्ते तयार करण्यासाठी प्रशासनाकडे कायम पाठपुरावा केला जातो. धायरी गावातून डीएसके विश्वकडे जाणार्‍या रस्त्यावर चामुंडा हॉटेल ते डीएसके विश्व कमान या दरम्यानचा रस्ता चार दिवसांपूर्वी करण्यात आला. सोमवारी सकाळी याठिकाणी जेबीसीने रस्ता खोदण्याचे काम सुरु केले. नागरिकांनी तेथील कामगारांकडे चौकशी केली असता भाजपच्या एका माजी नगरसेवकाच्या पीएनेच काम आहे एवढेच सांगितले जात होते. 

विजयानगर कॉलनीमधील रस्ता खोदला

सदाशिव पेठेतील विजयानगर कॉलनीमधील रस्त्याचे २४ एप्रिल रोजी डांबरीकरण करण्यात आले. यानंतर दोन दिवसांनी हा रस्ता एक वाहिनी टाकण्यासाठी खोदण्यात आला. याबाबत महापालिका पथ विभाग व क्षेत्रीय कार्यालय यांच्याकडे विचारणा केल्यानंतर एकमेकांवर टोलवा टोलवी करण्यात आली.

माणिकबाग येथे खोदाईमुळे रस्त्यावर साचले ड्रोनेजचे पाणी

आदर्श पंधरा रस्त्यामध्ये कामे केलेल्या सिंहगड रस्त्यावर पुन्हा खोदाई केली जात आहे. या रस्त्यावरील माणिकबाग येथील ब्रह्मा हॉटेल चौकात पंधरा दिवसापासून खोदाईचे काम सुरू आहे. एका ठिकाणी चेंबरचे काम करण्यात आले आहे. 
 

Related Articles